@notAuth('volunteer') @endnotAuth
Facebook Instagram X youtube
campaign-detail-bg
राजगड
राजगड
icon दिनांक३० ऑगस्ट २०२६
icon ठिकाण: राजगड किल्ला, ता. राजगड (वेल्हे), जि. पुणे

वर्णन

राजगड किल्ल्याचा इतिहास

राजगड किल्ल्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपासून या डोंगराचा उल्लेख आढळतो. त्यावेळी या डोंगराचे मूळ नाव ‘मुरुंबदेव’ असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची पायाभरणी केली, तेव्हा त्यांनी तोरणा किल्ल्यासोबतच १६४७ मध्ये मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून घेतला. महाराजांनी या डोंगराचा कायापालट करून त्याला अभेद्य गडाचे रूप दिले. तीन सोंडांना तटबंदी घालून त्यांचे ‘माच्यां’मध्ये रूपांतर केले आणि मध्यभागी उंच बालेकिल्ला उभारला. १६५४ मध्ये या किल्ल्याचे नाव अधिकृतपणे ‘राजगड’ ठेवण्यात आले.

राजगडावर बसून महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढायांची रणनीती आखली. तब्बल २६ वर्षे हा गड मराठा साम्राज्याची राजधानी राहिला. या काळात अनेक ऐतिहासिक घटना येथे घडल्या. ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईंचे निधन याच गडावर झाले. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावरील छाप्यानंतर महाराज सुरक्षितपणे लाल महालातून परत येऊन राजगडावर पोहोचले. १६६४ मध्ये सुरतेवर स्वारी करून मिळवलेली प्रचंड संपत्ती याच गडावर आणून स्वराज्याच्या खजिन्यात जमा करण्यात आली. १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी तह झाला, ज्यात महाराजांनी २३ किल्ले मुघलांना दिले, मात्र स्वतःकडे ठेवलेल्या १२ महत्त्वाच्या गडांमध्ये राजगडाचा समावेश होता.

औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करून १२ सप्टेंबर १६६६ रोजी महाराज सुखरूपपणे याच गडावर परतले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजाराम महाराजांचा जन्म राजगडावर झाला. सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यांना याच गडावरून पाठविले. पुढे १६७१-१६७२ मध्ये महाराजांनी रायगडाला राजधानी म्हणून निश्चित केले आणि राजगडावरून राजधानी रायगडाकडे हलविली.

इतिहासातील या सर्व घटनांमुळे राजगड हा केवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या संघर्षाचा, शौर्याचा, स्थापत्यकौशल्याचा आणि इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे.

किल्ल्याची रचना

नीरा-वेळवंडीका आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्‍यांच्या मधोमध मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. याच डोंगरावर वसलेला राजगड हा मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना मानला जातो. भक्कम तटबंदी, सुयोग्य रचना आणि रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचे स्थान यामुळे हा गड संरक्षण व प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. सुमारे चाळीस किलोमीटर परिघ असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १३७६ मीटर आहे. मजबूत बुरुज, चिलखती तटबंदी आणि चतुराईने आखलेली रचना यामुळे हा गड अभेद्य झाला. 

गडावर जाण्यासाठी पाली दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा हे दोन मुख्य मार्ग आहेत. पाली दरवाजा हा प्रमुख मार्ग असून दोन दरवाजे पार करून गडावर पोहोचता येते. राजगडाची रचना पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा अशा तीन माच्या आणि एका बालेकिल्ल्याने विभागलेली आहे. गडावरील तीन स्तरांमध्ये बांधलेली तटबंदी आजही मराठ्यांच्या लढाऊ कौशल्याची साक्ष देते. पश्चिमेला संजीवनी माची असून तिच्या पूर्वेला सुवेळा माची आहे. सुवेळा माचीवरील “नेढे” नावाची नैसर्गिक दगडी कमान हे गडाचे मुख्य आकर्षण आहे. माचीच्या टोकावर हत्तीच्या आकाराचा खडक दिसतो, तर काळेश्वरी बुरुजावरून आजूबाजूच्या दऱ्यांवर लक्ष ठेवता येत असे.

गडाचा मध्यभाग पद्मावती माची म्हणून ओळखला जातो. ही माची सर्वात विस्तीर्ण असून स्वराज्याच्या प्रशासकीय कामासाठी वापरली जात असे. येथे पद्मावती देवीचे मंदिर, तलाव, राजवाड्याचे व सदरचे अवशेष आजही पाहायला मिळतात. मंदिरासमोरच महाराणी सईबाईंची समाधी आहे. संजीवनी माची सुमारे अडीच किलोमीटर लांब असून संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. तिच्यावर तीन थरांची तटबंदी आणि एकोणीस बुरुज बांधलेले आहेत. या माचीवरून तोरणा किल्ल्याकडे जाण्यासाठी आळू दरवाजाचा वापर केला जात असे.

सुवेळा माची ही गडाच्या पूर्व दिशेला असून ती संजीवनी माचीप्रमाणेच लांब आणि अरुंद आहे. सुवेळा माचीच्या टोकावरून निसर्गसौंदर्याचे अप्रतिम दृश्य दिसते. ‘नेढे’ ही नैसर्गिक कमान गडाचे वैशिष्ट्य ठरते. सुवेळा माचीवर एक नैसर्गिक खडकाची कमान आहे ज्याला आरपार भगदाड आहे. यालाच ‘नेढे’ म्हणतात, जे गडाचे मुख्य आकर्षण आहे. माचीच्या टोकावर हत्तीच्या आकाराचा एक मोठा खडक आहे. काळेश्वरी बुरुजावरून आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले जात असे. 

राजगडाचा बालेकिल्ला हा सर्वात उंच आणि सुरक्षित भाग आहे. बालेकिल्ल्याकडे जाणारा मार्ग अरुंद व उभ्या चढणीचा आहे. प्रवेशद्वार ‘महादरवाजा’ म्हणून ओळखले जाते. येथे जननी मातेचे प्राचीन मंदिर असून पिण्याच्या पाण्यासाठी दगडी टाक्या खोदलेल्या आहेत. बालेकिल्ल्यावरून तोरणा, सिंहगड, पुरंदर आणि रायगड यांसारखे किल्ले स्पष्टपणे दिसतात.

महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमधील उत्तुंग शिखरांवर वसलेला आणि मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा राजगड हा केवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या अस्मितेचा केंद्रबिंदू आहे. राजगडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्गदृश्य मन मोहून टाकतात. त्याची भौगोलिक रचना, अभेद्य तटबंदी आणि तिथून दिसणारा सह्याद्रीचा अफाट विस्तार कोणत्याही शिवप्रेमीच्या किंवा पर्यटकाच्या मनात आदराची भावना निर्माण करतो.

मोहिमेची वैशिष्ट्ये

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी, सह्याद्रीच्या कुशीत दिमाखाने उभा असलेला दुर्गराज राजगड येथे ‘आपला मावळा’ तर्फे दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी भव्य स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी हजारो मावळे राज्याच्या विविध भागातून आले होते. कोणी मित्रांसोबत, कोणी कुटुंबासह, तर कोणी एकट्याने आले होते. आपल्या अस्मितेचा, पराक्रमाचा आणि अभिमानाचा वारसा जतन करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात उत्साह होता. लोकनेते खासदार मा. डॉ. निलेश लंके यांच्या उपस्थितीमुळे हा उत्साह आणखी द्विगुणीत झाला होता. आदल्या दिवशीच्या मुक्कामाची, भोजनाची आणि सोयीसुविधांची त्यांनी घेतलेली काळजी प्रत्येक मावळ्याने अनुभवली होती.

सकाळी सात वाजता अंगावर ‘आपला मावळा’चा टी-शर्ट, हातात भगवा आणि मनात शिवरायांचा जयघोष घेऊन हजारो मावळे राजगडाच्या पायथ्याशी जमले. राजगडाची चढाई कठीण होती, पण मावळ्यांच्या निर्धारापुढे तीही लहान ठरली. पुरुष, महिला, तरुण, लहान मुले—सर्वांच्या चेहऱ्यावर “गडासाठी आलोय, काम पूर्ण करूनच परतणार” ही भावना स्पष्ट दिसत होती.

चढाईदरम्यान ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आणि झाडांचे संरक्षण करण्यासाठी जाळ्या बसवण्यात आल्या. झाडू, फावडे, टिकाव, कोयते, माहिती फलक, बाकडे, दोरखंड आणि रोपे हे सर्व साहित्य घेऊन मावळे राजगडावर चढत होते. धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी मजबूत दोरखंड बांधण्यात आले.

दोन तासांच्या खडतर चढाईनंतर अखेर हजारो मावळ्यांनी राजगडाचा माथा गाठला. तिथे सर्वांनी जिजाऊ वंदना घेतली आणि गडकोट स्वच्छता व संवर्धनाची शपथ घेतली. त्यानंतर प्रत्यक्षात श्रमदान सुरू झाले. कुणी प्लास्टिकचा कचरा गोळा करत होते, कुणी मंदिर परिसर स्वच्छ करत होते, कुणी समाधी परिसराची स्वच्छता करत होते, तर कुणी गडाच्या भिंतीवरील शेवाळ काढत होते. गडावर ठिकठिकाणी नवीन बाकडे बसवण्यात आले, माहिती फलक उभारण्यात आले आणि धोकादायक भागांमध्ये सुरक्षिततेसाठी मजबूत दोरखंड बांधण्यात आले. लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके स्वतःही श्रमदानात सहभागी झाले आणि प्रत्येक मावळ्याचा उत्साह वाढवत होते.

दिवसभराच्या अथक श्रमांनंतर राजगडाचा परिसर अधिक स्वच्छ व आकर्षक दिसू लागला. ‘Before’ आणि ‘After’ मधला फरक स्पष्ट जाणवत होता. मात्र या बदलापेक्षाही मोठा बदल झाला होता तो मावळ्यांच्या मनात. शरीर थकलं होतं, हात दमले होते, पाय थकले होते, पण चेहऱ्यावर समाधान होतं, डोळ्यांत अभिमान होता आणि मनात एकच भावना होती—“हो, आपण केलं!”

संध्याकाळी सर्व मावळे सुखरूप पायथ्याशी पोहोचले. तिथे ‘आपला मावळा’ परिवारातर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली. गरमागरम भोजनाचा आस्वाद घेताना थकलेल्या चेहऱ्यांवर पुन्हा हास्य उमटलं.

ही मोहीम निसर्गरम्य वातावरण आणि पावसामुळे अविस्मरणीय ठरली. राज्याच्या विविध भागातून आलेल्या मावळ्यांनी या उपक्रमातून एकजुटीची ताकद दाखविली. इतिहास जपूया, गड स्वच्छ ठेवूया, पर्यावरण वाचवूया आणि शिवरायांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया या भावनेने हजारो मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते.

 किल्ल्यांसाठी आवश्यक मागण्या व सुधारणा

पायाभूत सुविधा व सुरक्षितता

पाणी व स्वच्छता व्यवस्था

ऐतिहासिक व सांस्कृतिक जतन

पर्यावरण संवर्धन

पर्यटक सुविधा

रोजगार व स्थानिक सहभाग

आपला प्रभाव

संख्या नाही, बदल मोजतोय!

६६५
स्वयंसेवक उपस्थित होते
१५०
एकूण लागवड संख्या
३
एलईडी लाईट बसवण्यात आले
१०
ट्री गार्ड बसवण्यात आले
५ तास
एकूण कालावधी
१.०० टन
कचरा उचलला
२
एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या
२ हेक्टर
एकूण स्वच्छ केलेला परिसर
१०
एकूण फलक लावण्यात आले