वर्णन
भुदरगड किल्ला – सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक ऐतिहासिक गड
🗺️भौगोलिक स्थिती
भुदरगड किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला असून दुधी तलावामुळे त्याने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. हा किल्ला सपाट जांभ्या दगडाच्या पठारावर बांधलेला आहे.
- लांबी: उत्तर-दक्षिण दिशेने सुमारे ८०० मीटर
- रुंदी: पूर्व-पश्चिम दिशेने सुमारे ७०० मीटर
- क्षेत्रफळ: अंदाजे १८० एकर
- तटबंदीची लांबी: सुमारे ५ किमी
- उंची: समुद्रसपाटीपासून ३११० फूट
किल्ला मनोहर-मनसंतोषगडच्या पूर्वेस असलेल्या डोंगरमाथ्याच्या टोकावर युद्धरणनीतीच्या दृष्टीने बांधण्यात आला आहे. कोकण ते कोल्हापूर आणि दक्षिण भारत ते उत्तर महाराष्ट्र या व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भुदरगड अत्यंत महत्त्वाचा होता. रांगणा घाट, आंबोली घाट यांसारख्या व्यापारी घाटवाटा या किल्ल्यावर येऊन मिळत.
🛡️लष्करी आणि प्रशासकीय महत्त्व
भुदरगड हा मध्यवर्ती लष्करी तळ आणि प्रशासकीय केंद्र होता. याच्या नियंत्रणाखाली खालील सहा दुय्यम व तृतीय श्रेणीचे किल्ले होते:
- भैरवगड
- सोनगड
- रांगणा
- मनोहर-मनसंतोषगड
- नारायणगड
- महादेवराड
रांगणा आणि भुदरगड हे एकमेकांशी थेट निगडीत असून डोंगरमाथ्याच्या टोकावर वसलेले आहेत. पठारावरील सौम्य उतार, नैसर्गिक खडकांचे कडे आणि दाट जंगल यामुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण लाभते. पाण्याचा मुबलक साठा आणि विस्तीर्ण भूभागामुळे मोठ्या सैन्याची तैनाती शक्य होती.
🏰स्थापत्य वैशिष्ट्ये
- तटबंदी बुरुजांसह उभारलेली असून प्रत्येक बुरुज रणनीतीनुसार नियोजित आहे.
- प्रवेशद्वार सी-आकाराच्या दरीत असून दोन्ही टोकांवर बुरुज आहेत.
- असुरक्षित भागांवर अतिरिक्त तटबंदी आणि चिलखती बुरुज बांधले गेले आहेत.
- बांधकामात चिरा, दगड आणि चुन्याचा वापर करण्यात आला आहे.
📜ऐतिहासिक पार्श्वभूमी
- ११८७: राजा भोज द्वितीय (शिलाहार घराणे) यांनी भुदरगड बांधला असावा.
- १२०१: यादव राजा सिंघन यांनी करवीर प्रांतात सत्ता स्थापन केली.
- पुढे हा किल्ला बहामनी, विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात गेला.
- १६६७: शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराज्यात आणला, पण लवकरच आदिलशाहीने पुन्हा ताबा घेतला.
- १६७२: शिवाजी महाराजांनी पुन्हा किल्ला जिंकून लष्करी चौकी म्हणून पुनर्बांधणी केली.
- १८४४: कोल्हापूरच्या गडकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बाबाजी अहिरेकर आणि सुभान निकम यांच्या नेतृत्वाखाली ३०० सैनिकांनी प्रतिकार केला. इंग्रजांनी तोफांच्या साहाय्याने किल्ला जिंकून तटबंदी उद्ध्वस्त केली.
🛕सध्यस्थिती
- पेठ शिवापूर ही पूर्वीची बाजारपेठ होती.
- पावसाळ्यात भातशेती केली जाते.
- अनेक घरांचे अवशेष आणि पुरातन मंदिरे आजही शिल्लक आहेत.
- प्रमुख स्थळे:
- जखुबाई मंदिर
- पोखर धोंडी
- पुरातण महादेव मंदिर
- गडदेवता श्री भैरवनाथ मंदिर
- दुधी तलाव
- भवानी मंदीर (अंबा माता)
- गडसदर, तटबंदी, पूर्व दरवाजा, चिलखती बुरुज, चोर दरवाजा, नरसिंह तोफ
- किल्लेदाराच्या वाड्याचे अवषेश, पुरातण गुहा
प्रत्येक माघ महिन्यात कृष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत श्री भैरवनाथ यात्रेची मिरवणूक निघते. हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.